रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात सलग पाच दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे आता गुहागर व राजापुर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. खेडमधील जगबुडी नदी व राजापुर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्याच्या पालशेत गावामध्ये ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने १५ ते १६ घरांमध्ये पुराचे शिरले. सकल भागातील घरामध्ये कंबरभर पाणी साचले. गुहागरच्या बाजारपेठेमध्ये पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुहागर तालुक्यामध्ये रविवारी दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. अचानक आलेले पुराचे पाणी लोकवस्तीत शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. नागरिकांना हे पाणी कसे आणि कुठून आले? हे समजले नाही. त्यामुळे सगळीकडे एकच धावपळ उडाली. ज्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, त्या ठिकाणी गुहागरचे तहसीलदार परिशित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला.
लांजा तालुक्यातील वाकेड घाटात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीसोबत संरक्षक भिंतीचाही भाग कोसळला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. प्रशासनाची यंत्रणा दरड हटवण्याचं काम करत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकारामुळे महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जाच्या पुन्हा एकदा समोर आला आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोसळणा-या पावसामुळे संगमेश्वर बसस्थानक परिसर चिखलाने भरला आहे. महामार्गाचे सुरु असलेल्या कामाचा या भागाला मोठा फटका बसला आहे. तसेच संगमेश्वर बाजार पेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. याबरोबर आलेल्या पुरामुळे धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच येथे जवळच असलेल्या हॉटेलमध्ये पाणी शिरले. संगमेश्वर गोळवली आमकरवाडी येथील मुसळधार पावसामुळे डोंगर खचल्याचा प्रकार घडला. तसेच कसबा हायस्कूलच्या आवारात पुराचे पाणी शिरल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वांची तारांबळ उडाली.
राजापुर तालुक्यातील अर्जुना आणि कोदिवली नदीने इशारा पातळी ओलांडल्याने हे पाणी राजापुर बाजारपेठेत शिरले. पुराचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाऊस १०२१.९२ मिमी तर सरासरी ११३.५४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पावसाची नोंद लांजा तालुक्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मंडणगडात ६६.५० मिमी, खेड १०७.२८ मिमी, दापोली ९६.१४ मिमी, चिपळूण १२८.३३ मिमी, गुहागर १३६.८० मिमी, संगमेश्वर १२९.५० मिमी, रत्नागिरीत ९९.७७ मिमी, लांजा येथे १३९.६० मिमी, राजापूरमध्ये ११८.०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती उद्भविल्याने अनेक ठिकाणी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासर्वांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.