कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून राज्य सरकारने तत्काळ यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा स्थगित करुन तत्काळ कोल्हापूर जिह्य्याला भेट द्यावी, अशी कळकळीची विनंती आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरातील पूरस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील अनेक गावे ही पूर्णपणे पूराने वेढली गेली आहेत. ग्रामस्थांनी जनावरेही सोडून दिली आहेत. इथली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने एनडीआरएफच्या जास्तीत जास्त तुकड्या आणि हेलिकॉप्टर्स तत्काळ येथे मदतीसाठी पाठवणे गरजेचे आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी गंभीर परिस्थिती ओढवू शकते, याची मला खात्री झालेली आहे.
कागल तालुक्यात आणि एकूणच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी शिरलेले आहे. धरणं पूर्णपणे भरल्यामुळे पाणी जाण्यासाठी वाव नाही. त्यामुळे पाण्याची पातळी सारखी वाढते आहे. आलमपट्टी धरणातूनही जास्तीत जास्त विसर्ग वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला देण्यात याव्यात त्याशिवाय पूरस्थिती आटोक्यात येणार नाही. जिल्ह्याला जोडणारे सर्व महामार्ग बंद झाले आहेत, कुठलेही रस्ते आता सुरु नाहीत. जनावरे सोडून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सरकारने कोल्हापूरबाबत गांभीर्याने पावलं उचलावीत, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारे याकडे लक्ष घालावे, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली आहे.