लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचा प्रचार ताकदीने करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोमवारी जाहीर केला.
पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देउ नये असे जाहीर मत व्यक्त केले होते. मात्र, त्यांना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर तर केलाच, जत तालुक्यात जगताप यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद देत त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचार करण्यासाठी आज जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
आणखी वाचा-उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडाफोडीवरुन अमित शाह यांना टोला, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले ‘चेलेचपाटे’
या बैठकीतच जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राने राजीनामा सादर केला असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यासाठी व काँग्रेसचे विशाल पाटील यांचा प्रचार करून निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जगताप यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, प्रा. आबासाहेब सावंत, कुंडलिक दुधाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णु चव्हाण, लक्ष्मण बोराडे, चिदानंद हाके, आनंदराव पाटील या तालुक्यातील भाजपच्या पदाधिकार्यांनी पक्षाचे राजीनामे देत असल्याचे यावेळी जाहीर करून माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील यांना सक्रिय पाठिंबा देण्यात येईल असे जाहीर केले.