इस्लामपूर येथील मोर्चात भाजप नेत्यांचाही सहभाग

दिगंबर शिंदे,  लोकसत्ता
सांगली
: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या बालेकिल्लय़ात एल्गार पुकारला असून प्रस्थापितांविरुद्ध लढा उभारण्याचा त्यांचा हा प्रयत्न हातकणंगले लोकसभा मतदार संघ समोर ठेवून केल्याचे दिसते. शेट्टी यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीकडे साखरपट्टय़ाचे लक्ष लागले आहे.

शेट्टी यांचे राजकारण उभे राहिले ते केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या विरोधातच. उसदरासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच साखर सम्राटांना दरवर्षी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत होणाऱ्या ठरावाची प्रतीक्षा असायची.

मात्र २०१४ नंतर झालेल्या निवडणुकीनंतर सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेल्यानंतर त्यांचे महायुतीतील भाजप प्रेम आटू लागले. खोत यांना भाजप नेत्यांकडून दिले जाणारे महत्त्व शेट्टींच्या पचनी पडले नाही.

यामुळेच त्यांनी तत्कालीन भाजपप्रणीत सरकारविरुद्ध आत्मक्लेश यात्रा काढली. संघटनेतील रविकांत तुपकर यांना महामंडळाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. आणि खोत यांची संघटनेतून हकालपट्टीही केली. या सर्व घडामोडी शेट्टी भाजपपासून दुरावल्याचे निदर्शक होत्या.

जिल्हा नियोजन मंडळात संधी नाही 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्तीही लांबणीवर पडल्याने आता ही अस्वस्थता वाढीस लागली आहे. आघाडी असूनही जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडीपासून संघटनेला दूर ठेवण्यात आले. एकही सदस्य नियोजन मंडळावर घेतला गेला नाही. यातूनच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीचा प्रश्न सध्या सांगली, कोल्हापूर जिल्हय़ाच्या उसपट्टय़ात ऐरणीवर आहे. उसाखालील क्षेत्र मोठय़ा प्रमाणात पुरामुळे बाधित झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतून राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. उसासाठी ही मदत केवळ १३५ रुपये प्रतिगुंठा आहे. इस्लामपूर येथे काढण्यात आलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी भाजपचे जिल्हा  उपाध्यक्ष तथा इस्लामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिराळा येथील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना सोबतीला घेतले. पाटील व नाईक यांचे राजकीय शत्रू जयंत पाटील आहेत.

या एकाच मुद्दय़ावर हे सर्व जण एकत्र आले आहेत. अद्याप शेट्टी यांनी भाजपशी घरोबा करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी त्यांची वाटचाल त्या दिशेने चालू आहे. यामुळे त्यांची आता राजकीय मांडणी २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालली आहे हे मात्र निश्चित.

मात्र, हातकणंगले मतदार संघामध्ये असलेल्या वाळवा आणि शिराळा मतदार संघातील भाजपशी संधान असलेल्या रयत क्रांती या सदाभाऊ खोत आणि भाजपचे सम्राट महाडिक यांच्या गटाला एल्गार मोर्चामध्ये सहभागी करून घेण्यात आले नव्हते हेही लक्षात घ्यायलाहवे.

या दोन मतदार संघांमध्ये या दोन्ही नेत्यांची ताकद म्हणण्यापेक्षा उपद्रव मूल्य दुर्लक्षून चालणार नाही. महाडिक यांचे लक्ष्य शिराळा विधानसभा असून नाईकांचा वारसा त्यांना पुढे रेटायचा आहे, तर खोत यांना संघटना बळकट करण्याबरोबरच भाजपशी मैत्री दीर्घकाळ कशी राहील हे पाहायचे आहे.

राजकीय अस्थिरता

अपेक्षेप्रमाणे ज्या साखर कारखानदारीविरोधात संघटनेचा पाया रचला गेला त्याच कारखानदारांच्या पंगतीला जाऊन ते बसले. याचा परिणाम व्हायचा तो झाला. राष्ट्रवादी-काँग्रेसशी आघाडी करून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र हक्काच्या मतदाराला साखर कारखानदारांशी त्यांची झालेली जवळीक पचनी पडली नाही. त्यांना शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला. धैर्यशील माने यांना त्यांनी पराभूत केले. या राजकीय पीछेहाटीनंतर विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांना अपेक्षित यश मिळाले तर नाहीच, पण सत्तेच्या वर्तुळातून बाजूला गेल्याने राजकीय अस्थिरता वाटय़ाला आली.

पूरग्रस्तांच्या न्याय्यहक्कासाठी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. संघटनेच्या दृष्टीने सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे वाटत आले आहे. यासाठी संघटनेला यापूर्वी कधी सत्तेची गरज भासली नाही, यापुढेही भासणार नाही. भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्यासोबत कोणीही आले तरी आम्हाला वावगे वाटणार नाही.

 – महेश खराडे, स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष

शेतकरी हिताचे निर्णय भाजप अधिक चांगल्या पद्धतीने घेत होते, याची जाणीव आता त्यांना झाली असली तरी केवळ सत्तेपासून बाजूला झाल्यानेच त्यांना उपरती झाली आहे. जनताही आता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. यामुळेच त्यांना पुन्हा नवीन मित्रांची आठवण आली असावी.

सदाभाऊ खोत, आमदार