सोलापूर : पत्र्याच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने गायीला वाचविण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचाही मृत्यू झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली. दरम्यान दक्षिण सोलापूरमध्ये शेतात ट्रॅक्टर चालविताना वीजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला आहे.

माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील घटनेत रसिका विठ्ठल रेडे (वय ६५) आणि शिक्षिका असलेल्या प्रियांका अमोल रेडे (वय २८) अशी मृत्युमुखी पडलेल्या सासू-सुनेची नावे आहेत. या दोघी गोठ्यात ज्या गायीला वाचविण्यासाठी गेल्या होत्या, त्या गायीचाही विद्युत धक्का बसून मृत्यू झाला. या दुर्घटनेत गोठ्यात गाय मृत्युमुखी पडल्याचे पाहून वृद्ध रसिका रेडे या गाईच्या जवळ गेल्यावर त्यांनाही विद्युत धक्का बसला आणि त्यांनी जागेवर प्राण सोडला. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची जाऊ अंबूबाई रेडे गेल्या असता त्या विद्युत धक्क्याने दूर फेकल्या गेल्या, तर गोठ्यात पत्र्याच्या जाळीत उतरलेल्या विद्युतप्रवाहाचा तीव्र धक्का बसून, त्यांची सून प्रियांका रेडे यासुद्धा प्राण गमावून बसल्याचे दिसून आले.

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्यात विद्युतप्रवाह उतरल्याचे लक्षात आल्याने तत्काळ तेथील डीपीचा वीज पुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. गोठ्याशेजारीच विद्युत खांब असल्याने वरूनच विद्युत तारा गेलेल्या आहेत. गोठ्यात पहाटे जोरदार पावसात विद्युतप्रवाह उतरला होता. ही दुर्घटना घडल्याचे लक्षात येताच अमोल रेडे यांनी जवळच असलेला डीपी बंद केला.

दक्षिण सोलापूरमध्ये दोघांचा मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तूर गावात शेतात ट्रॅक्टर चालविताना ट्रॅक्टरवरील लोखंडी पाइप आणि त्यावरील विद्युत वायरचा संपर्क झाल्याने आणि त्यात ट्रॅक्टरमध्येही विद्युत प्रवाह उतरल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला. बसवराज शिवानंद पाटील (वय ३४) आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे (वय ३७) अशी दोघा मृतांची नावे आहेत. या दोघांना बेशुद्धावस्थेत सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

गटारामध्ये पडून मुलाचा मृत्यू

शहरातील जिंदगी चौकाजवळ देसाई नगरात उघड्या गटारीत मॅनहोलमध्ये पडून एका नऊ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आदिल उस्मान शेख (रा. देसाई नगर) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आपल्या घराजवळ खेळत असताना तो घराजवळच सुनील बळी यांच्या वीटभट्टी येथे गेला. तेथे बाजूलाच थोबडे यांच्या खुल्या प्लाॅटिंगजवळ उघड्या गटारीत मेनहोलमध्ये आदिल शेख हा खाली पडला. त्या वेळी तेथे पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे त्याला गटारीचे उघडे मेनहोल असल्याचे लक्षात आले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.

एसटी बस व जीपची धडक

माढा-कुर्डुवाडी रस्त्यावर उपळाई बुद्रुक येथे एसटी बस आणि जीप यांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य १५ जण जखमी झाले. संजय हुबाले असे मृताचे नाव आहे.