मराठवाडय़ात सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. नांदेडात ३, तर हिंगोलीत एकाचा वीज पडल्याने बळी घेतला.
नांदेड व हिंगोली जिल्ह्य़ांत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. वीज पडून नांदेड व हिंगोली जिल्ह्य़ात ४ जण ठार झाले, तर ५जण जखमी झाले. दोन बैलही दगावले. रविवारी सायंकाळपासून नांदेडमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सोमवारी दुपारीही दोन तास जोरदार पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात पावसाचा जोर होता.
लोहा तालुक्यातील तांदळा येथे शेख बीबी शेख हैदरसाब (वय ५५), अनसूया राहुल कांबळे (वय ३५, जोशी सांगवी) शेतात काम करीत असताना पाऊस सुरू झाल्याने लिंबाच्या झाडाखाली दोघी थांबल्या होत्या. मात्र, वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत पिंपळदरी येथे नारबा गोविंद कांबळे यांचाही वीज पडून मृत्यू झाला. ते शेतामध्ये बैल घेऊन गेले होते. शनिवारी रात्री ते परतले नाहीत. त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला असता गावालगतच्या शिवारात कांबळे यांचा मृतदेह आढळून आला.
िहगोलीत सोमवारी सकाळपासून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी येत होत्या. जिल्ह्य़ात वेगवेगळ्या तीन ठिकाणी वीज पडल्याने एक महिला ठार झाली, तर दोन बैल दगावले. वीज पडून आजरसोंडा येथे पाचजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुपारी दोनच्या सुमारास एकरुखा शिवारात वीज पडून रुक्मिनबाई प्रसाद बोखारे (वय ३०) यांचा मृत्यू झाला, तर १० वर्षांची मुलगी निर्गुणा सोनाजी बोखारे जखमी झाली. या दोघी एका शिवारात काम करीत होत्या. आजरसोंडा शिवारात लिंबाजी आहेर शेतात बैल बांधण्यास गेले होते. साडेचारच्या सुमारास वीज पडल्याने त्यांचा मुलगा श्रीनिवास लिंबाजी आहेर जखमी झाला, तर दोन बैल दगावले. औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथे वीज पडून तिघेजण जखमी झाले. आशा मारुती घुरे, मारुती नारायण घुगे, भगवान सावळे अशी जखमींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four died with three women to crave thunderbolt in marathwada
First published on: 10-09-2013 at 01:58 IST