सांगली : आयुष्यमान भव योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून जिल्ह्यातील 46 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथे या बालकांवर हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, औषधोपचार, निवास, भोजन व्यवस्था या सर्व सोयी शासन मोफत करत आहे. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बालक व पालकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी बालकांना स्वतंत्र बसने मुंबईकडे पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस, व्यवस्थापक कविता पाटील तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून मराठ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या 205 लाभार्थी बालकांपैकी 60 लाभार्थी बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी एस.आर.सी.सी. रुग्णालयाने संदर्भित केलेले 30 लाभार्थी बालक आणि यापूर्वी शस्त्रक्रिया प्रलंबित असलेल्या बालकांपैकी तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणारे 16 लाभार्थी बालक अशा 46 लाभार्थी बालकांवर या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मंजूर अनुदानातून करण्यात येणार असून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त अनुदान हे मुंबईतील खाजगी सेवाभावी व धर्मादाय संस्था यांच्याकडून एस.आर.सी.सी. हॉस्पिटलकडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.