सातारा : राज्यात आगामी २० ते २५ वर्षांच्या काळात कोणाचे राजकारण चालणार याचा विचार करून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी केले.
पळशी (ता. खटाव) येथे खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते,राजेश पाटील, राजेंद्र राजपुरे, मुख्य सर व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, जितेंद्र पवार, संदीप मांडवे, पृथ्वीराज गोडसे, सी. एम. पाटील, प्रा. अर्जुन खाडे, चंद्रकांत पाटील, सुभाष नरळे, अर्जुन वलेकर, युवा नेते योगेश फडतरे, सभापती दत्तात्रय पवार, बबन कदम, संजीव साळुंखे, राहुल पाटील, श्रीराम पाटील, सुनील फडतरे, प्रा. सदाशिव खाडे, अभय देशमुख, मंगेश फडतरे, अशोक कुदळे, संभाजी फडतरे, सुहास पिसाळ, तानाजी मगर, हिंमत माने, महेश घार्गे, इंदिरा घार्गे, प्रीती घार्गे, प्रिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार पाटील म्हणाले, की आपण सर्वजण काँग्रेस संस्कृतीत वाढलेले लोक आहोत. शाहू, फुले विचार जोपासणाऱ्या नेत्याचा विचार जोपासणे हे आपले काम आहे. सद्य:स्थितीत ही विचारधारा जोपासणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय दुसरे नाव नाही. आगामी काळात तेच राजकारणात टिकून राहू शकतात. राजकारणाबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्याची स्थिती, प्रत्येक कारखान्याने वाढवलेली गाळपक्षमता याचा विचार करून ऊस उत्पादन वाढवण्याची गरज आहे, त्यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
घार्गे यांनी अडचणीच्या काळात सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. खटाव तालुक्यात सहा लाख टन क्षमतेचा कारखाना उभारल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव, तसेच वेळेत तोड मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बदलत्या काळात शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही नितीन पाटील यांनी केले.
या वेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राजेंद्र सरकाळे यांचेही भाषण झाले.