गडचिरोलीत महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या रक्तपातात १५ जवान शहीद झाले असून या नक्षली हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना वंदन करतो. त्यांचे बलिदान विसरता येणार नाही. नक्षलींचा हिंसाचार खपवून घेणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असून या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले,गडचिरोलीत सुरक्षा दलाच्या जवानांवरील भ्याड नक्षली हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूरवीर जवानांना मी वंदन करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. असा भ्याड हल्ला करणाऱ्या नक्षलींचा हिंसाचार खपवून घेणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास गृहमंत्रालय तयार आहे. जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.