अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींची माहिती …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरगावः श्री मयुरेश्वर
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. हे क्षेत्र भूस्वांद भुवन म्हणून ओळखले जाते. सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे.
स्थान- ता. बारामती, जि. पुणे
अंतर- पुणे-सासवड-मोरगाव ६४ कि.मी, पुणे-चौफुला-मोरगाव ७७ कि.मी, मुंबई २२५ कि.मी

थेऊर : चिंतामणी

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.

स्थान- ता.हवेली, जि.पुणे
अंतर- थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. थेऊर फाटा ते थेऊर ५ कि.मी, मुंबई १९१ कि.मी

सिद्धटेक : सिद्धिविनायक

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे फार कठिण असते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे…

स्थान- पो. जलालपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर
अंतर- सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने गाडीने थेट मंदिरापर्यंत जाता येते.
दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे.

रांजणगाव : महागणपती
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

स्थान- ता. शिरूर जि, पुणे हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे.
अंतर- रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.

ओझरचा विघ्नहर
विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे.

स्थानः ता.जुन्नर जि.पुणे
अंतरः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० वरील नारायणगावपासून व आळे फाट्यापासून जवळ. कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील मढपासूनजवळ. ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी मार्गे जुन्नर

लेण्याद्रीचा गिरीजात्मज

अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नांव मिळाले.

स्थान- पोस्ट गोळेगाव, ता.जुन्नर जि.पुणे
अंतर- मुंबई-कल्याण-माळशेजघाट-मढ-लेण्याद्री १८० कि.मी, पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १४० कि.मी
लेण्याद्रीपासून इतर अष्टविनायकांचे अंतर- ओझर १७ कि.मी, रांजणगाव १२० कि.मी, मोरगाव १५५ कि.मी, थेऊर १३२ कि.मी, सिद्धटेक १८० कि.मी, महड १३५ कि.मी, पाली १७५ कि.मी

महडचा वरदविनायक

पुणे किंवा मुंबईमार्गे जाताना खोपोलीजवळ महड येथे अष्टविनायकातील वरदविनायक मंदिर आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. भक्तांना वर देणारा म्हणून त्याचे नाव ‘वरदविनायक’ ठेवले. सध्या ‘महड’ नावाने हे क्षेत्र ओळखले जाते. १७२५ मध्ये येथील मंदिराचा जीर्णोद्धार कल्याणचे सुभेदार सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला व त्यांनीच पुढे महड गाव विनायकाला अर्पण केले.

पालीचा बल्लाळेश्वर
बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यतील सुधागड तालुक्यातील हे पाली तीर्थक्षेत्र असून, कृतयुगामध्ये त्याचे नाव ‘पल्लिपूर’ होते. फार पूर्वी हे मंदिर लाकडी होते. या मंदिराच्या जवळच ढुंढिराज विनायकाचे मंदिर असून तेथील मूर्तीही स्वयंभू आहे. पालीच्या बल्लाळाला जेथे गणपती प्रसन्न झाला होता, तेथे ॐकार गणेशाने बल्लाळाला गणेश लोकात नेण्यासाठी साक्षात् विमान पाठविले, अशी आख्यायिका आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

 

 

 

 

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati utsav 2019 ashtavinayaka temple of maharashtra nck
First published on: 29-08-2019 at 12:27 IST