सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावर सध्या चाकरमान्यांची परतीची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपल्यामुळे मुंबई आणि इतर शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. परंतु, कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या एकाच मार्गिकेमुळे आणि दररोज धावणाऱ्या ४० ते ४५ गाड्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी मार्गिका नसल्यामुळे गाड्यांना अनेक ठिकाणी थांबवून दुसऱ्या गाड्यांना मार्ग द्यावा लागत आहे. विशेषतः तामिळनाडू, केरळ, गुजरात, दिल्ली, राजस्थान, पंजाब यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. याचा थेट परिणाम कोकणातील गणेशभक्तांसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांवर होत आहे. या गाड्यांना अनेक लहान स्थानकांवर थांबवून ठेवावे लागत असल्याने त्या अनेक तास उशिराने धावत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या ३६२ विशेष फेऱ्यांमुळे प्रवाशांची सोय झाली असली तरी, परतीच्या प्रवासातील हालअपेष्टांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, आणि सिंधुदुर्गनगरी यांसारख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या गाड्या अनेक तास उशिराने येत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकावर जागा मिळत नाही आणि त्यांना रात्री खोळंबून राहावे लागत आहे. काही गाड्या तर मध्यरात्री १ ते २ वाजता सुटत आहेत.
पावसाचा तडाखा आणि प्लॅटफॉर्मची स्थिती
अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे प्रवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे. अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर पुरेसे छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसात भिजूच गाडीमध्ये चढावे लागत आहे. जेष्ठ नागरिक प्रवासी मानवतावादी विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी कणकवली स्थानकावरील अनुभव सांगितला की, त्यांना बसायला जागाही नव्हती आणि पाऊस सुरू असताना प्रवाशांना पावसात भिजूनच गाडीत चढावे लागले. ही परिस्थिती पाहता कोकणातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची मागणी
या सर्व गैरसोयींमुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. कोकण रेल्वे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे या मार्गाचा विकास खुंटला आहे, अशी प्रवाशांची भावना आहे. जर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाले, तर विकासाला गती मिळेल आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असे त्यांना वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला असल्याचे म्हटले होते. तो प्रस्ताव लवकर स्वीकारून रेल्वे मंत्रालयाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
प्रवासी संघटनांच्या प्रमुख मागण्या:
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि सचिव मिहीर मठकर यांनी कोकण रेल्वेच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
दुहेरी मार्गिका: कोकण रेल्वे मार्गावर लवकरात लवकर दुहेरी मार्गिका तयार करण्यात यावी.
सावंतवाडी टर्मिनस: नियोजित सावंतवाडी टर्मिनसचे काम तात्काळ पूर्ण करावे.
जादा गाड्या: सावंतवाडीपर्यंत आणखी दैनंदिन गाड्या सुरू कराव्यात.
बोगी वाढवणे: अनेक गाड्यांना कमी बोगी असल्यामुळे गर्दी होते. त्यामुळे किमान २२ बोगींच्या गाड्या चालवाव्यात. सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची गर्दी पाहून जादा फेऱ्यांची सोय करावी.
या मागण्यांवर तातडीने लक्ष दिल्यास प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे संघटनेचे मत आहे.