सांगली : महिलांच्या अंगावरील दागिने धूमस्टाईलने दुचाकीवरून लंपास करणार्या तिघांच्या टोळीला सांगली पोलीसांनी अटक करून पाच लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सोमवारी दिली. या तिघाकडून तीन दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सकाळच्यावेळी व्यायामासाठी पायी चालत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबाबत दक्ष राहून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना अधिक्षक बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या.
आणखी वाचा-निवडणुकीचे वर्ष देशाच्या दृष्टीने निर्णायक- पृथ्वीराज चव्हाण
या सूचनानुसार पाळत ठेवून असताना या विभागाचे कर्मचारी अरूण पाटील व सूरज थोरात यांना दप्तरी नोंद असलेले गुन्हेगार ताकारी-कराड मार्गावरील मच्छिंद्रगडच्या खिंडीत येणार असल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी सापळा लावून सुधारक अशोक मोहिते (वय ३५), भास्कर उर्फ संभाजी सावंत (वय २९ दोघेही रा. कोतीज, ता. कडेगाव) आणि कादर शरीफ काजी (वय २४ रा. अंबक, ता. कडेगाव) या तिघांना तीन दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेउन झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळे सोन्याचे दागिने आढळून आले.
या तिघांनी इस्लामपूर शहरात तीन, कुंडल व तासगावमध्ये प्रत्येकी दोन आणि कराडमध्ये एक असे आठ चेनस्नॅचिंगचे प्रकार केले आहेत. सकाळी प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरूनच हिसडा मारून लंपास करण्याची या टोळीची पद्धत होती.