अकोले : निसर्गसौंदर्य लाभलेल्या तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रसिद्ध ‘रंधा फॉल’चे सौंदर्य आता अधिकच बहरणार आहे. हा धबधबा आधिक चांगल्याप्रकारे आणि सुरक्षित पाहता यावा यासाठी येथे धबधब्यावर लवकरच काचेचा पूल साकारला जाणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाची निविदा आणि संकल्पचित्र आज प्रसिद्ध केले आहे. या कामास अंदाजे ४ कोटी ३१ लाख ९३ हजार ६१३ रुपये खर्च येणार असून हे काम २४ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवरील रंधा धबधबा हा राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात. काही वर्षांपूर्वी दिवंगत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नाने रंधा धबधबा सुशोभीकरणाची काही कामे झाली. धबधबा जेथून चांगला दिसतो तेथे पोहोचण्यासाठी आकर्षक पूल झाला. नदीपात्रात निरीक्षण मनोरा, घाट, घोरपडा देवी मंदिराचे बांधकाम आदी कामे झाली. परिसराचे सौंदर्य खुलले. धबधब्याचे दर्शन सुखद बनले. आता आमदार लहामटे यांच्या प्रयत्नाने होत असणारा हा काचेचा पूल धबधब्या इतकाच पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. जिल्ह्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच पूल असेल.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. अकोले तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करून रोजगार निर्मितीचा माझा मानस आहे. पर्यटन विकासातून तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच हे एक पाऊल. रंधा धबधबा येथे ‘स्काय वॉक’ अर्थात काचेचा पूल साकारला जाणार असून आज त्याची निविदा आणि या पुलाचे संकल्पचित्रही प्रसिद्ध केले आहे.

शंभर फूट खोल धबधबा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्याला अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. पर्वत शिखरे, डोंगरमाथे, खोल दऱ्या, उंच कडे, विस्तीर्ण पठारे, डोंगरदरीतून वळण घेत खळाळत वाहणारे ओढे, नद्या अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे तालुक्यात आहेत. पावसाळ्यात डोंगर कड्यावरून फेसाळत कोसळणारे लहान मोठे धबधबे म्हणजे तालुक्याच्या निसर्ग रूपाचे जणू अलंकार. भंडारदराचा ‘आंब्रेला फॉल’ आणि ‘रंधा धबधबा’ हे जणू या सर्व धबधब्यांचे मानबिंदू.

भंडारदऱ्यापासून वाहत येणाऱ्या प्रवरा नदीचे पाणी रंधा गावाजवळ दोन अवखळ उड्या घेत शंभर फूट खोल दरीत कोसळते. हाच तो प्रसिद्ध रंधा धबधबा. पूर्वी पावसाळ्याच्या चार महिन्यांबरोबरच वर्षभर भंडारदऱ्याचे आवर्तन काळातही धबधब्याचे दर्शन घडत असे. काही वर्षांपूर्वी धबधब्याच्या वरील बाजूस बंधारा बांधून नदीचे पाणी कोदणी वीज प्रकल्पासाठी वळविले गेले आणि आवर्तन काळात होणारे धबधब्याचे दर्शन थांबले. निळवंडे धरणामुळे या धबधब्याच्या सौंदर्याला काही प्रमाणात बाधा पोहोचली आहे. कारण निळवंडे धरणाचे ‘बॅक वॉटर’ थेट या धबधब्यापर्यंत पोहोचते. धरण भरले की निम्म्यापेक्षा जास्त धबधबा धरणाच्या पाण्यात गायब होतो.

त्यामुळे आता पावसाळ्यात धरण भरल्यानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते, तेव्हा किंवा मुसळधार पाऊस असताना भंडारदरा ते रंधा दरम्यान प्रवरा दुथडी भरून वाहते तेव्हाच या धबधब्याचे दर्शन होते. मात्र पावसाळ्यात विशेषत: धरणातून स्पिलवेमधून पाणी सोडले जात असताना धबधब्याचे जे दर्शन होते ते मंत्रमुग्ध करणारे असते. पावसाळ्यात दोनतीन वेळा तरी धबधब्याच्या रौद्र रूपाचे दर्शन घडत असते. सभोवतालच्या हिरव्यागार डोंगर रांगा, पावसाळी ढगाळ वातावरण, खळाळत वाहणारी प्रवरा, तिचा नाद, नदीकाठचे घोरपडा देवीचे मंदिर आणि वातावरणातील नीरव शांतता यामुळे हा परिसर पावसाळ्यात अतिशय रमणीय बनतो.

या धबधब्यावर होणारा हा काचेचा पूल तालुक्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. आता पर्यटक धबधबा सुरू नसला तरी केवळ काचेचा पूल पाहण्यासाठी येथे येतील. त्यामुळे वर्षभर रंधा धबधबा परिसरात पर्यटकांची वर्दळ राहील. हा पूलच भविष्यात एक पर्यटनस्थळ होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यात असा पूल अद्याप कोठे झालेला नाही. या पुलाच्या रूपाने तालुक्यात अजून एका पर्यटन ठिकाणाची भर पडत आहे.