हक्काच्या मुस्लिम मतदारांतूनच उमेदवारी दाखल होण्याच्या हालचालीने सांगली मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. मानसन्मानाच्या कारणातून मुस्लिम कार्यकर्त्यांकडून दाखल होणारी उमेदवारी टाळण्यासाठी काँग्रेसला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे हे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. काँग्रेसने कोणतीही बैठकीची औपचारिकता न पाळता विद्यमान संसद सदस्य प्रतीक पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसअंतर्गत असणारा अल्पसंख्याक समाजाचा गट नाराज झाला. किमान उमेदवारीसाठी चाचपणी तरी व्हावी अशी अपेक्षा असणारे पक्षाच्या उमेदवार लादण्याच्या भूमिकेमुळे नाराज झाले. त्यातूनच माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
धत्तुरे यांनी आपल्या उमेदवारीच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. या मेळाव्यात ‘आम आदमी’ला सन्मान ही भूमिका घेऊन धत्तुरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार बुधवार दि. २६ मार्च रोजी उमेदवारी दाखल केली जाणार आहे. धत्तुरे यांच्या उमेदवारीमुळे अल्पसंख्याक समाजातील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.  
धत्तुरे यांच्या बंडखोरीपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांनीही अपक्ष म्हणून मदानात उतरण्याची घोषणा एका स्वतंत्र मेळाव्यात केली. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी महापौर मनुद्दीन बागवान, शिक्षण मंडळाचे माजी सभापती इब्राहिम चौधरी आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दोन्ही काँग्रेसची नेतेमंडळी एकीकडे आघाडी धर्माचे पालुपद आळवत असताना कार्यकत्रे मात्र बंडखोरीच्या तयारीत आहेत. आणि ही बंडखोरी अल्पसंख्याक समाजातून होत असल्याने काँग्रेसला विचार करायला लावणारी ठरणार आहे.