कोल्हापूर : जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची मानसिकता कार्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे. यातूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळू शकेल, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा येथे आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शशिकांत शिंदे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत अपयश येऊनही आजच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता शरद पवारांच्या विचाराचे समाजकारण पुढील काळामध्ये यशस्वी होईल. यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. प्रभाग रचनेचे नियम पाळले जातात का, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार दिले जातील. परंतु प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे. निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. काही वर्षांनंतर आपलीच राष्ट्रवादी सत्तेत असेल, असा दावा त्यांनी केला.
शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी आगामी निवडणुका लढण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात यावेत. तालुकानिहाय पदाधिकारी निवड करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, ॲड्. अनिल घाटगे, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, शिवानंद माळी, पद्मजा तिवले, उदयसिंह पाटील आदींची भाषणे झाली.