कोल्हापूर : उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी आणि या रुग्णालयात उपचारासाठी जगभरातील विद्यार्थी व नागरिक येतील. येथे योग व निसर्गोपचाराचे नामवंत तज्ज्ञ घडतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रथम वर्ष बी.एन.वाय.एस.चा प्रवेशास प्रारंभ व उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डाॅ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, उत्तुर येथील अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न. रा. पाटील आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथील जे.पी. नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे. यासाठी २०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून १५ एकर जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालये असून उत्तुर येथील हे सहावे योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल.
कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय गडहिंग्लज तालुक्यात तर फिजिओथेरपी महाविद्यालय उत्तुर येथे सुरु होण्यासाठी जागेची चाचपणी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.