सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात बुधवारी (आज) झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आलेल्या या पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
भात पिकाचे मोठे नुकसान
सध्या जिल्ह्यात भात कापणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कापणी करून वाळत ठेवलेले भात या अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजले असून, ते जमिनीला भिडले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दुपारनंतर पाऊस कोसळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर वैभववाडी तालुक्यात बुधवारी (आज) विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे भातशेती आडवी झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. गेले आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यामुळे भात कापणीला जोर आला होता, मात्र या पावसाने कामात मोठा व्यत्यय आणला आहे.
वैभववाडी आठवडा बाजारात गोंधळ
बुधवारी वैभववाडी शहरात आठवडा बाजार असतो. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे वैभववाडी शहरात पाणीच पाणी झाले होते. नव्याने बांधलेल्या गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते आणि परिणामी शहरातील रस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात ऑक्टोबरच्या हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी दुपारी ३.३० नंतर हवामानात झालेल्या बदलामुळे आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला असला तरी, भात कापणी झालेले शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत.