हिंगोली : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या नाल्यांना पूर आले आहेत. अनेक भागांतील शेतशिवारात पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कळमनुरी-पुसद मार्गावर असलेल्या शेंबाळपिपरी नजीकच्या विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शनिवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच सिद्धेश्वर धरणाचे ८ दरवाजे उघडून पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्यापही सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे जांबुतराव सखाराम कुंभार यांच्या घराची भिंत कोसळली सुदैवाने जीवितहानी झाली नाही. डोंगरकडा येथील शेतकरी रावसाहेब अडकिने यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले. त्यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले.

आखाडा बाळापूर परिसरात पिंपरी बुद्रुक येथील ओढ्याला पूर आल्याने पिंपरी, चिखली, कानेगावसह पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे. कामठा फाटा ते येलकी मार्गावरही ओढ्याला पूर आल्याने बेलथर व कसबे धावडा या गावाचा संपर्क तुटला आहे. इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाणीपातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने रविवारी सकाळी ९ वाजता परत चार दरवाजे दीड मीटरने उचलून पाण्याचा पैनगंगा नदीत विसर्ग सुरू केला आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याची एकूण ७ वक्रद्वारे १.५० मीटरने व ६ दरवाजे १ मीटरने चालू असून, पैनगंगानदी पात्रात ५४ हजार ४७६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे, कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याने नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले. त्याद्वारे ७ हजार क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. जलसंपदा विभागातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ दरवाजे १ फूट उघडण्यात आले. त्याद्वारे मुख्य धरणातून ६ हजार ७७९ व सांडव्यावरून ४३१ असा एकूण ७ हजार २० क्युसेक प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. पूर्णा प्रकल्पाचे मुख्य साठा असलेल्या येलदरी धरणात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला, त्यामुळे विद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे येलदरीतून सिद्धेश्वर धरणात विसर्ग सोडण्यात येत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी धरणाचे १४ पैकी ८ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणात होत असलेल्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागामार्फत देण्यात आली असून, नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा व तालुका महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील नऊ मंडळात अतिवृष्टी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रविवारी बहुतांश भागात विश्रांती घेतली असली तरी शनिवारी दिवसभरात आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या पावसात सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील मिळून नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिल्लोडमधील गव्हाली येथील सुधाकर साळवे यांच्या शेतातील बैल वीज पडून दगावला तर गेवराई कुबेर येथील शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या.

सिल्लोडमधील अजिंठा (६६.५), आमठाणा (६७.३), बोरगाव (६७.३), आंभई (१०३.८), उंडणगाव (६६) तर सोयगावमधील सोयगाव (११४.८), सावळादबारा (१२६.८), बनोटी (८८.८) व जरांडी (१०२.५) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात १ जून ते १७ ऑगस्टपर्यंत ३९७.७ मिमी एकूण पाऊस झाला आहे. नाथसागरात ९३.५९ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.