सावंतवाडी : हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी जारी केलेल्या ऑरेंज अलर्टनुसार, मालवणमध्ये आज मंगळवारी सायंकाळपासून समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे. जोरदार वाऱ्यासह उसळणाऱ्या उंच लाटांनी किनारी भागाला धडक देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टी आणि समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता.
आज मंगळवारी सायंकाळपासून मालवणच्या समुद्रकिनारी पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. लाटांचा जोर इतका होता की, राजकोट ते रॉक गार्डन या खडकाळ समुद्रकिनारी तर समुद्राच्या लाटांचे अक्षरशः तांडवनृत्य सुरू होते. महाकाय लाटा खडकांवर आदळून पाण्याचे उंच तुषार आकाशात उडत होते, हे दृश्य भयावह होते.दरम्यान, आज अमावस्या असल्याने समुद्राला विशेष ताण (उधाण) असणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर लाटांचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासन अलर्टवर असून, किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस समुद्रातील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी अनावश्यकपणे समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.