रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पडणा-या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सोनवी, जगबुडी, शास्त्री, अर्जुना आणि कोदवली नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून तुरळक पावसाची नोंद असताना सोमवारी रात्रीपासूनच पावसाने रूद्ररप धारण केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यातील जगबुडी नदी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी तसेच राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. तसेच जिल्ह्यातील वाशिष्ठी, सोनवी, काजळी व मुचकुंदा नदींच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, हरचेरी व चांदेराई बाजारपेठ भागात पाणी नदीची पातळी सोडून वर आल्याने नागरिकांची पळापळ झाली.
राजापुर येथील कोदवली नदी व मुचकुंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापुर शहर बाजार पेठेत व परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. लांजा येथील अर्जुना नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी ओसंडून वाहू लागल्याने सकाळपासून बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बाजारात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, अनेकांनी आपापला दुकानातील माल उचलण्यासाठी धावपळ सुरू केली. या भागातील मराठी शाळा, अंगणवाडी आणि कोंड-असुर्डे मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावर लोवले येथे पाणी भरल्याने वाहतूक कोंडी झाली. तसेच संगमेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांची बुरंबी येथे रांगा लागल्या. लांजा तालुक्यातील आंजणारीतील श्री दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत पाणी शिरुन पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. कोयना धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चिपळूण शहर भागात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करीत असल्याने शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड बाजार पेठेतील पाण्यात अडकलेल्या दुचाकीसह महिलेला वाचविण्यात यश आले आहे. मंडणगड तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपल्याने याठिकाणच्या शासकीय विश्रामगृह व एसटी आगार भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वहातुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच खेड कशेडी मार्गावरील बोगद्याच्या ठिकाणी दरड कोसळल्याने वहातूक बंद पडली. जिल्ह्यात मंगळवार रात्री पर्यत संततधार सुरु राहिल्याने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच पूरस्थिती भागात राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.