Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसाने राज्यभरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरड्या दुष्काळाचा सातत्याने सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. विदर्भात सात लाख हेक्टरला फटका बसला तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रावर, तसेच उत्तर कर्नाटकावर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील दोन – तीन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भात, सोयाबीन, भुईमूग, मका, ऊस, भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली.

सांगली जिल्ह्यात काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग ही पिके पाण्याखाली गेली. नदी, नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणी शिरले. त्याचा फटका मका, कांदा, डाळिंब या पिकांना बसला.

सोलापुरात हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मका, बाजरी, ज्वारी, तूर, डाळिंब आदी पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली.

विदर्भात सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, उडीद, मूग व अन्य पिकांना बसला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक बुडाले.

जळगाव जिल्ह्यात केळीसह कपाशी, मका, सोयाबीन आणि फळपिके पुराच्या पाण्याखाली गेल्याने ४४ गावांमधील ४३२७ हेक्टरचे नुकसान होऊन ५४८५ शेतकरी बाधित झाले.

नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ४० गावांतील ४०१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कांदा, सोयाबीन, मका यासह फळपिकांना सर्वाधिक फटका बसला.