राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. रत्नागिरीतील गोळप, पावस तर राजापूर शहर व परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील राजापूर व रत्नागिरी तालुक्यांत सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी पाणी भरले. पावस बाजारपेठ येथे पाणी भरले. गोळप मानेवाडी येथे डोंगर कोसळून काही मोटारसायकल मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या. मात्र यात जीवितहानी झाली नाही.
पावस बाजारपेठेत लोकांच्या घरात पाणी भरले. रत्नागिरीमध्ये शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी झाडे व दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने राजापूर शहरातील पिकअप शेडपर्यंत धडक मारली. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पावसात रस्ते, पूल यांची पुरती दुरवस्था झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १४ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ६५.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला असून, कुडाळ तालुक्यात सर्वात कमी ४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
मुंबईतही हजेरी
विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी सायंकाळपासून पुन्हा हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात पाऊस कोसळला. दरम्यान, मुंबईत रविवारी मुसळधार तर ठाणे पालघर भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उजनी धरण निम्मे भरले
सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठा पन्नाशीकडे वाटचाल करीत आहे. शनिवारी सकाळपर्यंत धरणात होणाऱ्या पाण्याची आवक वाढवून १५ हजार ६८२ क्युसेक वेगापर्यंत नेण्यात आली होती. धरणात प्रथमच पुण्यातील बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.