सांगली : पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील विसर्ग वाढविल्यामुळे कृष्णा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत कोयना येथे ११२, महाबळेश्वर २०२ आणि नवजा येथे १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर चांदोली धरणाच्या ठिकाणी ५४ मिलीमीटर नोंद झाली. कोयना धरणाच्या सायंकाळी सहा वाजता सहा वक्र दरवाज्यातून २९ हजार ६४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
तर चांदोलीमधून सायंकाळी चार वाजल्यापासून वक्र दरवाजे व विद्युतगृहातून १३ हजार ४४५ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होणार असल्याने नदीकाठी वास्तव्य असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पूरनियंत्रण कक्षातून करण्यात आले.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडून पिके पाण्याखाली गेली आहेत. तर कोयनेतील विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीवरील बहे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (जि. कोल्हापूर) हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
नदीपात्रातील पाण्याची वाढती पाणीपातळी, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून ८० हजार क्युसेकचा विसर्ग १ लाख २० हजार क्युसेक करण्यात आला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी १९ फूट झाली असून कृष्णेचे पाणी अद्याप पात्रातच असले तरी नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातून करण्यात आले.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस ४.१ मिलीमीटर झाला असून आज दिवसभर पावसाची एखादी सर येत होती. काही काळ सूर्य दर्शनही होत होते. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात ३८.१ मिलीमीटर नोंदला गेला.