छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा तब्बल १ लाख ८०१ किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागला. यामध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी झालेल्या २२ सप्टेंबरच्या एकाच दिवसात तब्बल ४६ हजार ६८३ किलोमीटरचा प्रवास रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.
१६ सप्टेंबरपासून पावसाचा पुन्हा जोर सुरू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयांतर्गत सात विभाग येत असून, आठ जिल्ह्यांतून सुटणाऱ्या बसच्या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबरपासूनच अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागण्याची वेळ आली. १६ सप्टेंबर रोजी नियत २९ बसच्या २१२ फेऱ्या रद्द केल्यामुळे १७ हजार ९९७ किलोमीटरचा प्रवास थांबला. १७ सप्टेंबरला नियत ५१ बसच्या १७५ फेऱ्या, तर १३ हजार ३९१ किमीचा प्रवास रद्द करण्यात आला.
२२ सप्टेंबर रोजी नियत ८२ बसच्या ७३३ फेऱ्या, तर ४६ हजार ६८३ किलोमीटरचा प्रवास थांबवावा लागला. मराठवाड्यात एकूण १९८ नियत बसच्या १ हजार ५१४ फेऱ्या रद्द करून १ लाख ८०१ किलोमीटरचा प्रवास थांबवण्यात आला होता, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाकडून मिळाली.
आठवड्यात १ हजार ४८३ फेऱ्या रद्द
१६ ते २२ सप्टेंबरदरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातून २०५ फेऱ्या, बीडमधून २६४, जालन्यातून १८२, लातूर विभागातून २००, नांदेडमधून २८, धाराशिवमधील ४१४ व परभणी विभागातून १९० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर विभागात २२ सप्टेंबरच्या एकाच दिवशी १७ हजार ३३१ किलोमीटरचा प्रवास थांबवण्यात आला होता. ११२ फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली.
लातूरमधील लिंबाळा ते निलंगा, मदनसुरी ते धानोरा, कोकळगाव ते नदी हत्तरगा, उस्तुरी ते टाकळी, बडूर ते कासार बालकुंदा, ढोकी ते धाराशिव (रुई मार्गे), औसा ते जवळगा मार्ग या ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतूक बंद करण्यात आली. तर जालना शहरामध्ये बसस्थानकाबाहेरील भोकरदन नाका रोडकडील पुलावर नदीचे पाणी आल्यामुळे या मार्गावरीलही वाहतूक बंद झालेली होती, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.