कराड : पश्चिम घाटक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरूच असून, कोयना धरणाचा पाणलोटात तर, मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बहुतेक धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून कोयनेतून ३३ हजार क्युसेकचा जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान बहुतेक धरणांमधून जलविसर्ग वाढवला जाणार असल्याने कृष्णा – कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कोयना धरणाचे दीड फुटांनी उघडण्यात आलेले सहा वक्री दरवाजे सोमवारी सायंकाळी चार वाजता तीन फुटांपर्यंत उघडण्यात आले. आता ते रात्री आठ वाजता साडेतीन फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रात ३३ हजार क्युसेकचा (प्रतिसेकंद घनफूट) जलविसर्ग करण्यात येणार आहे. तर, कोयनेच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा जलविसर्गही सुरूच ठेवण्यात आलों आहे.
कोयना पाणलोटात सोमवारी सायंकाळी पाज वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १३०.३३ मिमी. (सव्वापाच इंच) पाऊस होताना, कोयनेच्या धरणसाठ्यात ३.८९ टीएमसीने (अब्ज घनफूट) म्हणजेच धरण क्षमतेच्या ३.७९ टक्के पाण्याची भरघोस आवक झाली आहे. दरम्यान, उरमोडी, धोम, धोम- बलकवडी, कण्हेर अशा बहुतेक धरणांमधून जलविसर्ग वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान खात्याने धोकादायक (रेड अलर्ट) पावसाचा इशारा दिल्याने कोयना धरणासह अन्य धरणांमधूनही जलविसर्ग पटीने वाढण्याची भीती आहे.
सध्या कोयना धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ३५,०२० क्युसेकवरून (घनफूट) ४५,०८२ क्युसेक अशी झेपावली आहे. तर, जलसाठा ९४.०९ टीएमसीवरून (८९.४० टक्के) ९६.८७ टीएमसी (९२.०३ टक्के) झाला आहे. दरम्यान, सलग तीन दिवसातील जोरदार पावसामुळे कोयनेचा धरणसाठा वेगाने वाढत असल्याने तो नियंत्रित राखण्यासह धरणाखालील कोयना व कृष्णा नद्यांची पूरस्थिती टाळण्यासाठी धरण व्यवस्थापनाचे जुने संदर्भ पडताळत धरणातील जलविसर्गाचे काटेकोर नियोजन सुरु आहे. तर, कृष्णा- कोयना नद्यांच्या जलपातळी झेपावण्याची चिन्हे असल्याने या नद्यांकाठी खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. या पाश्वर्भूमीवर शासकीय यंत्रणाही दक्ष दिसत आहे.
आज सोमवारी (दि. १७) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटातील कोयनानगरला ३५ एकूण ३,५०१ मिमी., नवजाला ५७ एकूण ४,१७६ मिमी., महाबळेश्वर येथे ६७ एकूण ४,११६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना पाणलोटात चालू हंगामात आजवर ३,९.३१ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ७८.६२ टक्के) पाऊस झाला आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा जोर आणखी वाढल्याचे चित्र आहे. त्यात सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या केवळ नऊ तासात राधानगरी तालुक्यातील वाकी येथे १३३ मिमी. म्हणजेच सव्वापाच इंच पाऊस झाला. खालोखाल राधानगरी तालुक्यातीलच पाडळी येथे ७९ मिमी., वाई तालुक्यातील जोर येथे ७८ मिमी., सावर्डे येथे ७७, दाजीपूरला ६९, प्रतापगडला ६७, गगनबावडा येथे ६० मिमी. असा तुफान पाऊस झाला आहे. पश्चिम घाटातील काही धरणक्षेत्रात वारणा ४० मिमी., धोम २५, तारळी १४, कडवी ३४, धोम- बलकवडी २८, दुधगंगा ४१, उरमोडी १० मिमी. असा दिवसभरातील पाऊस आहे.