सातारा : साताऱ्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीर, धोम, धोम बलकवडी, उरमोडी यासह सर्व छोटी-मोठी धरणे पाझर तलाव काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
साताऱ्यातील वीर, धोम व धोम बलकवडी, उरमोडी, कण्हेर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारे वीर धरण भरल्याने नीरा नदी पात्रात सायंकाळी सहा वाजता ७ हजार ४८७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, पाण्यात उतरू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी केले आहे.
धोम बलकवडी धरणातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धोम धरणाची पातळी पाणी पातळी वाढत आहे. कण्हेर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. उरमोडी धरणही शंभर टक्केहून अधिक भरले आहे. त्यामुळे या धरणातून उरमोडी नदीला पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोयना, तारळी, येरळवाडी या मोठ्या व लघु पाटबंधारे धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून धोम बलकवडी धरणातून ९०४ क्युसेक, धोम ३३२९ क्युसेक, कण्हेर ५०९८ क्युसेक, उरमोडी ३९४१ क्युसेक, कोयना २०८६४ क्युसेक, वीर ७४८७ क्युसेक, येरळवाडी ११७९१ क्युसेक नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
नीरा प्रणालीतील भाटघर, देवघर, गुंजवणी विसर्ग सोडण्यात आला आहे. धोम बलकवडी धरण ९९.५० टक्के भरल्याने धरणातून सांडवा मार्गे सायंकाळी विसर्ग कृष्णा नदी पात्रातून धोम धरणात सोडण्यात आला आहे. धोम धरणातून विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वाई गणपती घाट, छोटा पूल, चिंधवली, मर्ढे, खडकी (वाई) हे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलावरून लोकांनी जाणे येणे टाळावे, असे धोम धरण पूरनियंत्रण कक्षातून कळविण्यात आले आहे.
यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ झाल्यास नदीपात्रात आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता सातारा व कृष्णा सिंचन विभाग व कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी कळविले आहे.