अलिबाग : अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.
अलिबाग मुरुड परिसरातील पर्यटन स्थळांवर शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात त्यामुळे अलिबाग वाडकर राष्ट्रीय महामार्गावर दर शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी होत होती. हजारो वाहने अरुंद रस्त्यावर आल्याने २५ ते ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता. पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचवलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन आणि रविवारी दुपारी दोन ते रात्री नऊ या कालावधीत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
जड-अवजड वाहने (ट्रक, कंटेनर, डंपर इ.) इत्यादी वाहनांना बंदी असेल.तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस,औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने,रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल.
हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक व पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव मिळेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे संकेत दिले होते.