सांगली : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यातून मदत पाठविण्यात येत असून, शुक्रवारी अंकलखोप व औदुंबर (ता. पलूस) येथून पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक रवाना करण्यात आला. तसेच खासदार विशाल पाटील यांच्या कार्यालयातही पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य पाठविण्यात येणार असून, यासाठी खासदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पूरग्रस्तांसाठी अंकलखोप येथील राजेश चौगुले फाउंडेशन व औदुंबर येथील श्री दत्त देवस्थान (ट्रस्ट), श्री म्हसोबा देवस्थान अन्नक्षेत्र, सांगली येथील सुखकर्ता गणेश मंडळ, अंकलखोप विकास सोसायटी यांच्या माध्यमातून पहिली मदत सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठविण्यात आली. या मदतीमध्ये पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्याचे कीट तयार केले आहे. एक हजार मूल्याचे साडेचारशे कीट आज रवाना करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादासाहेब सूर्यवंशी, देवस्थान ट्रस्टचे संस्थापक धनंजय सूर्यवंशी, अध्यक्ष संतोष पाटील, विश्वस्त अमर पाटील गौरव पाटील, वैभव सूर्यवंशी, विजय पाटील, प्रणव देशपांडे, महेश चौगुले, गौरव पाटील, अशोक शिंगटे, चौगुले फाउंडेशनचे राजेंद्र कुंभार, श्री म्हसोबा अन्नछत्र मंडळाचे सुनील चौगुले, सुखदेव गुरव, दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, खासदार पाटील यांच्या कार्यालयात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य संकलन केद्र सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी अन्नधान्य, औषधे, प्राथमिक उपचार साहित्य, स्वच्छतेची साधने, कपडे, पिण्याचे पाणी, शालेय साहित्य आदी वस्तू जमा करण्याचे आवाहन सांगलीकरांना करण्यात आले आहे. हे मदत साहित्य ३० सप्टेंबरपर्यंत संकलित करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.

कृष्णाकाठ आलेल्या महापुरात विदर्भ, मराठवाडा, सह अन्य भाागातुन पुरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत आली होती. आज त्या लोकांना मदतीची गरज आहे. कृष्णा काठावरील नागरिक पुरग्रस्तांना मदत करताना मदत न करता ते आपले कर्तव्य आहे. म्हणुन मदत देत आहेत असे धनंजय सुर्यवंशी यांनी सांगितले.