सावंतवाडी: कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत शेतकऱ्यांचे जीवन आणि शेती व्यवसाय धोक्यात आणला आहे. गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत. यातलाच एक हत्ती, ज्याचे नाव ‘ओंकार’ आहे, तो गेल्या चार दिवसांपासून गोव्यात दाखल झाला आहे.

​‘ओंकार’ हत्तीचा गोव्यात मुक्काम

​गेल्या चार दिवसांपासून ‘ओंकार’ हत्तीने गोवा राज्यातील तांबोसे, तोरसे, आणि मोपा परिसरात आपला मुक्काम वाढवला आहे. गोवा वन विभागाने या हत्तीला पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु गोव्यातील पोषक वातावरणामुळे हत्ती जायला तयार नाही. यामुळे सध्या तो पेडण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

​मनुष्यहानी आणि शेतीची नासधूस: या हत्तींमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे. ‘ओंकार’ने मोपा, कडशी मोपा, तोरसे आणि तांबोसे या भागांतील भातशेती आणि नारळाची झाडे मोडून काढली आहेत. तर दुसरीकडे, पाच हत्तींचा एक कळप दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावात धुमाकूळ घालत आहे. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेवरील भलामोठा भेलडा माड शाळेच्या छतावर पाडला, ज्यामुळे शाळेचे छत आणि आतील संगणक कक्षाचे मोठे नुकसान झाले.

​वनविभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह

​हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी वनविभाग आणि राज्य सरकारवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. वारंवार हत्तींना पकडण्यासाठी किंवा त्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम राबवण्याची मागणी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने नुकसान वाढत असल्याचा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला. घोटगे गावात झालेल्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची आणि हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

​प्रशासनाकडून गावकऱ्यांना इशारा

​‘ओंकार’ हत्तीच्या हालचालींमुळे गोवा राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. या पार्श्वभूमीवर, उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी तांबोसे येथे भेट देऊन गावकऱ्यांना कडक सूचना दिल्या. कामाशिवाय हत्ती असलेल्या भागात फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

​स्थानिकांनी फटाके फोडून किंवा गर्दी करून हत्तीला बिथरवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. गोवा वनविभागाचे अधिकारी ए. पी. रॉड्रीग्स यांनी सांगितले की, हत्तीला ज्या मार्गाने तो आला त्याच मार्गाने परत पाठवण्याची तयारी सुरू आहे, मात्र सध्या तो बिथरलेला असल्याने त्यात अडचण येत आहे.

ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. त्या अधिकाऱ्यांवर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी रोष व्यक्त केला. त्या अधिकाऱ्यांची बदली झाली. नवीन अधिकारी आले,पण पकड मोहीम राबविण्यासाठी वातावरण अनुकूल नसल्याने मोहीम रखडली आहे. नव्याने आलेल्या उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी गांभिर्याने विचार न करता कार्यालयात बसून कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानली त्यामुळे हत्ती पकड मोहीम जैसे थे आहे.