हिंगोली : शाळेच्या संबंधी मागवण्यात आलेली माहिती मुख्याध्यापकांकडे पाठपुरावा करूनही मिळत नाही, हे पाहून अखेर हिंगोलीचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनीच गुरुवारी एका शाळेसमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. शिवाय ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा एक दिवसीय उपोषणच करण्याविषयीचे पत्र शिक्षणाधिकारी दिग्रजकर यांनी पाठवल्याचा एक संदेश समाजमाध्यमावर पसरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
जिल्ह्यातील अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून वारंवार मागविलेली शैक्षणिक व प्रशासकीय माहिती मागण्यात आली. परंतु माहिती अनेकवेळा मागूनही ती मिळत नसल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाधिकारी दिग्रजकर यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत या शाळेची प्रगती अत्यंत असमाधानकारक आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासंबंधी माहिती अपूर्ण ठेवण्यात आली असून विविध शालेय उपक्रमांची माहितीही विभागाला सादर केलेली नाही.
जिल्ह्यातील इतर शाळा उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असताना, अंतुलेनगर शाळेत मात्र प्रशासकीय उदासीनता आणि कार्यातील शिथिलता दिसून येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
प्रशांत दिग्रसकर यांनी प्रतिक्रियेत सांगितले की, “मागील तीन ते चार महिन्यांपासून संबंधित शाळेकडून कोणतीही माहिती मिळत नाही. जिल्ह्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक शिक्षक आपल्या वैयक्तिक कामासाठी अथवा सोयीची पदस्थापना मिळण्यासाठी, शिक्षक संघटना, विद्यार्थ्यांच्या पालकांना हाताशी धरून किंवा विद्यार्थ्यांसोबत संगनमत करून, संघटनांचा दबाव टाकतात परिणामी विद्यार्थ्यांचे हित मागे पडते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.”
जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही, तर ४५ टक्के विद्यार्थ्यांना गणितातील मूलभूत प्रक्रिया जमू शकत नाही. ही स्थिती पालक आणि शिक्षक दोघांसाठीही धोक्याची आहे. अनेक वेळा कामचुकार शिक्षकांना नोटीस देणे, कारणे दाखवा, पत्रे दिली; मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असताना यामध्ये अधिक वेळ गेला, म्हणूनच हे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे शिक्षणाधिकारी दिग्रजकर यांनी सांगितले.