हिंगोली : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात असताना कन्हेरगाव नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रात्री नऊ वाजता सोडून दिले.

आंदोलक अचानक कृषिमंत्र्याच्या वाहन ताफ्यासमोर आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसीम अहमद फईम अहेमद देशमुख, दिलशान सिकंदरखान पठाण, सय्यद मोईस सय्यद मोईन, जुनेद अहेमद फईम अहेमद देशमुख, शेख असिफ शेख सरवर (सर्व रा. हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.