हिंगोली : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेचा मोठा गाजावाजा करून ६०० कोटी रुपये खर्चातून ६१९ गावात ६१६ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. आजपर्यंत कामावर ३४५ कोटी रुपयांचा खर्च झाला. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे सुमारे ४७ कोटींचे देयक थकले आहे. ५० कोटींची मागणी नोंदवली असता केवळ ६ कोटींचा निधी प्राप्त झाला. योजनेची कामे अधांतरीत असल्याने, जिल्हा प्रशासनाने उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र, अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई कागदोपत्री पूर्ण झाली नाही.
केंद्र शासनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २०२९ पर्यंत सर्व गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देऊन वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. काही कंत्राटदारांनी मोजकीच कामेही पूर्ण केलीत, मात्र, त्यांची देयके थकल्याने थकित देयक मिळाल्याशिवाय कामे न करण्याचा निर्णय कंत्राटदार संघटनेने घेतला. तसे जिल्हा प्रशासनाला यापूर्वी निवेदनही देण्यात आले होते. मिशनच्या कामांच्या देयकापोटी जिल्हा परिषदेने सुमारे ५० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. मात्र, ६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुमारे १३२ गावांमध्ये सुमारे शंभर कोटी रुपये खर्चातून योजनेची कामे तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. या योजनेच्या कामानिमित्त गावागावांत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले. आतापर्यंत केवळ पाच गावांतील कामे पूर्ण झाली. तर १२७ कामे अपूर्ण आहेत. कामे अपूर्ण असल्याने त्या त्या गावात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना वाट काढणेही अवघड झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑक्टोबर रोजी जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. उद्दिष्ट पूर्ण न करणारे उपअभियंते व कंत्राटदारांवर कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले होते. मात्र अद्याप कागदोपत्री ना कोणती कारवाई, ना योजनेच्या कामात प्रगती, असे चित्र आहे.
वसमत तालुक्यात १२७ गावांत जलजीवन मिशनअंतर्गत योजनेची कामे रखडली आहेत. कंत्राटदारांनी कामे पूर्ण करावीत, या संदर्भाने त्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. – गजानन नांदे, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा, वसमत