यवतमाळ : बहुचर्चित ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात दिल्ली येथील डॉक्टरला दोन कोटी रुपयांनी गंडा घालणाऱ्या आरोपीने कारागृहातून बाहेर आल्यानंतर आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंट येथे उघडकीस आली. संदेश अनिल मानकर (२२) असे मृताचे नाव आहे. त्याने प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यात घालून व त्यात ऑक्सिजन सिलिंडरमधील नायट्रोजन सोडून आत्महत्या केल्याचे आढळले.

उच्चशिक्षित तरुणी असल्याचे भासवून, समाज माध्यमातून मैत्री करत दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी महिन्यापूर्वी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने संदेशला अटक केली होती. त्याच्याकडून एक कोटी ७४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदेश कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये एका महिला नातेवाईकाकडे राहत होता. गुरुवारी त्याची ही महिला नातेवाईक वर्धा येथे गेल्याने तो फ्लॅटमध्ये एकटाच होता. हीच संधी साधून त्याने आत्महत्येपूर्वी काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या डोक्यात घातल्या. घरातील ऑक्सिजन सिलिंडरमधील नायट्रोजन त्यात सोडला. यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने आत्महत्येची पूर्वतयारी केल्याचे घटनास्थळावरील साहित्यावरून लक्षात येते, असे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरात त्याने ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवले होते. तसेच आत्महत्येपूर्वी तीन पानांचा मजकूर इंग्रजीत लिहून ठेवलेला आढळला. या सुसाईड नोटवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे. संदशेच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.