रत्नागिरी: राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे. कोकण मंडळाने सलग चौदाव्या वर्षी ९६.७४ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला.

निकालामध्ये रत्नागिरी पाठोपाठ कोल्हापूर द्वितीय व मुंबईने तृतीय क्रमांकाचे स्थान मिळवले असल्याची माहिती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सहसचिव दीपक पवार, सहाय्यक सचिव मनोज जोशी उपस्थित होते. इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेत प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत श्रेणी यांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले. खेळाडूंचे क्रीडा प्रस्तावांची ऑनलाइन छाननी करण्यात आली. एकूण १५४ विषयांची परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरात घेतली होती.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. कोकणात ११,९५६ मुलगे व ११,६०७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यातील ९५.५० टक्के मुलगे व ९८.०३ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कॉपीचा एक प्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरपत्रिकेचे पान फाडण्याचा प्रकार असे दोन गैरप्रकार घडले होते. गतवर्षीपेक्षा कॉपीचे प्रमाण ७ टक्केने कमी झाले आहेत. परीक्षा शांततेत यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत भरारी व बैठ्या पथकांतील अधिकारी, प्राचार्य, परीक्षेसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्याचे चौगुले म्हणाले.

बारावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात १५६ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ३८ व सिंधुदुर्गमध्ये ८७ महाविद्यालयांसाठी २३ अशी एकूण २४३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ६१ परीक्षा केंद्र होती. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यात २१३ पैकी १०१ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८१ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी, गुण सुधार योजनेत यंदा प्रथमच दोनऐवजी तीन संधी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२५, फेब्रुवारी २०२६ व जून जुलै २०२६ मध्ये परीक्षा देता येता येणार आहे.

नियमित विद्यार्थी निकाल

जिल्हाबसलेले विद्यार्थीउत्तीर्ण विद्यार्थीटक्केवारी
रत्नागिरी१५२९७१४६३५९५.६७
सिंधुदुर्ग८२६६८१६२९८.७४
एकूण२३५६३२२७९७९६.७४

कोकण मंडळ शाखानिहाय निकाल

शाखाप्रविष्ठ विद्यार्थीउत्तीर्ण विद्यार्थीटक्केवारी
विज्ञान८८४५८६८३९८.१६
कला  ५१३५४७३५९२.२१
वाणिज्य८६४६८४७९९८.०६
व्यावसायिक७३३७१२९७.१३
टेक्निकल सायन्स२०४१८८९२.१५

कोकण बोर्डामुळे कोकणाच्या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखता आले. परंतु कोकणातील विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परदेशी विद्यापिठाचे आव्हान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाची भाषा अवगत करून नव्या युगाच्या नव्या वाटा दमदारपणे  चोखाळल्या पाहिजेत. -अ‍ॅड. विलास पाटणे, उपाध्यक्ष, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी