अहिल्यानगर : जामखेड येथील कलाकेंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यातील ७ जणांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील अटक केलेल्यांकडून एक गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.
अनिकेत नितीन कदम (वय २५, एमआयडीसी रस्ता, आष्टी, बीड) याच्या ताब्यातून गावठी कट्टा व काडतुसे व पांढऱ्या रंगाची स्कॉडा मोटर असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यासह अक्षय किशोर बोरुडे (वय २९, मिरी रस्ता, तिसगाव, पाथर्डी, नगर), शहनवाज अन्वर खान (वय ३०, इंदिरानगर, तिसगाव) जयसिंग दादापाटील लोंढे (वय २५, आडगाव, पाथर्डी), अविनाश भास्कर शिंदे (वय २९, तिसगाव), गणेश सचिन शिंदे (वय १९, तुळजापूर पेठ, तिसगाव), ऋषिकेश गरुड (वय १८, तिसगाव) अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या टोळक्याने जामखेड येथील कला केंद्रावर जाऊन दहशत निर्माण केली तसेच तिथे लोकांना मारहाण करून कलाकेंद्राची तोडफोड केल्याचा गुन्हा जामखेड पोलिसांनी दाखल केला आहे. टोळक्याने केलेल्या दहशतीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेला आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखालील अंमलदार सुरेश माळी, दीपक घाटकर, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, सागर ससाने, रोहित यमुल, भगवान थोरात, सतीश भवर, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, सोनल भागवत यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढून हा गुन्हा अक्षय बोरुडे यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळवली. त्यानुसार कारवाई करत सात जणांना अटक केली.
जामखेड शहराच्या परिसरात अनेक कलाकेंद्र चालवले जातात. या कलाकेंद्र चालकांना टोळक्यांच्या दहशतीचा वारंवार सामना करावा लागतो. या परिसरातील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जातो. यापूर्वीही कलाकेंद्र चालकांना खंडणीच्या मागणीसाठी शस्त्राचा वापर करून धुडगूस घालण्याचे प्रकार घडलेले आहेत. केवळ नगर जिल्हाच नव्हे तर लगतच्या बीड, धाराशिव जिल्ह्यातील गुन्हेगारही तेथे येतात.