रत्नागिरी – एक लाख रुपयांसाठी वृध्द वडिलांचे अपहरण करणाऱ्या मुलाला चिपळूण व देवरूख पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे घडलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. देवरूख, संगमेश्वर) याने  आपले सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) या वडिलांचे मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास देवरूख येथील राहत्या घरातून अपहरण केले. त्याने पैशासाठी वडिलांच्या  मानेवर सुरा ठेवून पळवून नेले.  त्यानंतर व्हॉटसअॅपवर हात-तोंड बांधलेला फोटो घरच्या मोबाईलवर पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. देवरूख पोलीसांनी या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात  त्याची आई सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर संपूर्ण प्रकरणाचा  उलगडा झाला आहे. सुनीता मराठे यांनी देवरूख पोलीसांना दिलेल्या माहितीनसार सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने सोमवारी रात्री ११ वाजता घरातच पैशासाठी आईकडे तगादा लावला. तीने नकार देताच आई आणि नातीसमोरच मुलाने वडिलांच्या मानेवर सुरा ठेवून धाक दाखवत, आता एक लाख रुपये द्या नाहीतर यांना ठार मारतो अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्तीने कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून पळून घेवून गेला. पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवर अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअप कॉल आला.

त्यात मोबाईलवर वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला. श्रीकांत याने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली. नकार दिल्यास, मी आता मागे हटणार नाही अशी धमकी दिली. या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. श्रीकांत हा वडीलांना घेवून पहिल्यांदा रत्नागिरी येथे गेला. त्यानंतर तो मंगळवारी सकाळी बसमध्ये बसून चिपळूण याठिकाणी गेला. तो चिपळूण येथे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पो. हे. काँ. प्रशांत मसुरकर ते काँ. सचिन कामेरकर, हे. काँ. सचिन पवार, हे. काँ. अ वेलवणकर यांनी श्रीकांत मराठे याचा   घेण्यास सुरुवात केली. याचवेळी तो मंगळवारी दुपारी चिपळूण येथे असल्याचे समजताच देवरूख पोलीसांनी तात्काळ चिपळूण येथे जावून कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला चिपळूण पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले. यानंतर सायंकाळी त्याला देवरूख पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यावर त्याच्यावर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत.