कोल्हापूर : रस्ते कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत मंगळवारी मनसेच्या आंदोलनावेळी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा तसेच कपडे फाटतोवर मारण्याचा इशारा देण्यात आला. टेबलवर कागदपत्रे भिरकावण्यात आल्याने वाद निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यापैकी पहिला भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आज मनसेने सार्वजनिक बांधकाम खात्यावर मोर्चा काढला.
अधिकारी व मक्तेदार यांनी भ्रष्टाचार केल्याचे प्रतीक म्हणून बारा फुटी ड्रॅगन मोर्चामध्ये आणला होता. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी गांधीनगर ते नवी चिंचवड या मार्गावर दहा कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवले असले तरी तो अवास्तव आहे. त्यामध्ये अधिकारी मक्तेदार यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून त्याचे पोते भर पुरावे दाखल करीत आहोत. आज कारवाई नाही झाली तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.




हेही वाचा : “अरे आधी उतरू दे ना, एवढी घाई का करतोय”, चांद्रयानबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल विधान
संघर्ष टळला
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना मनसेचे सचिव प्रसाद पाटील हे एकेरीवर येत अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. खोटे बोलताना काही वाटत नाही का, अशी विचारणा करीत कपडे फाटतोवर मारण्याचा इशारा दिला. तर दिंडोर्ले यांनी कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने संघर्ष टळला.