छत्रपती संभाजीनगर : भाषिक अर्थाने कायम हेटाळणी आणि तुच्छतेने पाहिल्या जाणाऱ्या गाढवांची संख्या कमी झाल्याने गाढव जतन करण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आणि पशुपालकांसाठी गर्दभ व्यवस्थापन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. घोड्यांप्रमाणेच गाढवांनाही ग्लँडर्स, फार्सीसारखे संसर्गजन्य आजार जडतात. त्यांनाही इतर पशू-पक्ष्यांप्रमाणे लसीकरणाची गरज असते. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदे गाढवांनाही लागू आहेत, असे आता पशुसंवर्धन अधिकारी आणि गर्दभ पालकांना सांगितले जात आहे.

गर्दभांना त्यांच्या आरोग्य, आहाराच्या दृष्टीने कसे हाताळावे व त्यांची प्रजनन संख्या वाढवण्याच्या दृष्टीने काय करावे याचा कार्यक्रमही ठरवला जात आहे. नांदेडमधील सगरोळी आणि परळी येथे ‘गर्दभ व्यवस्थापन’ कार्यशाळा घेण्यात आल्या.

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे धर्मा डाँकी सँक्च्युअरी संस्थेच्या पुढाकाराने आणि पशुसंवर्धन विभाग व किनवट नगर परिषदेच्या विद्यमाने नुकतेच गाढवांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. वृद्ध, अपंग, बेवारस गाढवासारख्या अश्ववर्गीय प्राण्यांना सगरोळी येथे ठेवण्याचाही एक ठराव करण्यात आला आहे. नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट परिसरातील गाढव, खेचरांची संख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य तपासणीचा आदेश दिला होता. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांचे एक प्रशिक्षण जुलै महिन्यात घेण्यात आले. त्याला ८५ ते ९० अधिकारी हजर होते.

तर, परळी येथे संस्थेकडून ‘गर्भावस्थेतील गाढवांचे व्यवस्थापन, प्रसूती व नवजात गाढवांची काळजी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ८० पशुधन विकास अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती धर्मा डाँकी सँक्च्युअरी संस्थेचे विश्वस्त अभिजित महाजन यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई परिसरात ७०० ते ८०० वीटभट्ट्या आहेत. यातील २०० वीटभट्ट्यांवर मिळून १ हजार ४०० मादी गाढवे आहेत. तर सगरोळी भागात आढळून येणारी गाढवे ही नर आहेत. मादी गाढवांच्या प्रसूतिपूर्व आणि नंतरच्या काळातील योग्य आरोग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असल्याने एक कार्यशाळा नवी दिल्लीच्या फेडरेशन इंडियन ॲनिमल ऑर्गनायझेशनच्या (एफआयएओ) सहकार्याने घेण्यात आली. या कार्यशाळेत परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. बाबूलाल कुमावत यांनी मार्गदर्शन केले. गाढवांमध्येही गर्भपाताची कारणे व अन्य समस्या आढळून येत असल्याने त्यांना हाताळण्याशी संबंधित माहिती देण्यात आली.

साधारणपणे गाढवांना ओझे वाहण्याचे काम असल्याने त्यांनाही जखमा होतात. म्हणून टीटीचे इंजेक्शन दिले जाते. जंतनाशक (डीहॉर्मिंग) औषध पाजले जाते. त्यांचे लसीकरणही केले जाते. पोटशूळ (कोलिक) उठण्यासारख्या गाढवांच्या आजाराबाबतही जागृती केली जात असून, कुठलाही हिरवा चारा द्यावा किंवा भुईमूग, सोयाबीनचे काड देताना त्यामध्ये गुळाचे पाणी, मीठ, पाणी टाकून दिले, तर त्यांना पचायला सोपे जाते, असे मार्गदर्शन कार्यशाळेत केल्याचे महाजन यांनी सांगितले. गदर्भ आहाराच्या या कार्यशाळेची सध्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

गर्दभ संख्येत घट

२०११ च्या विसाव्या पशुगणनेत गाढवांची राज्यभरात जेमतेम साडेचार ते पाच हजारांच्या आसपास संख्या होती. ती आता अर्ध्यावर आल्याची भीती आहे. पशुसंवर्धन विभागाकडूनही गाढव उपचारासाठी दुर्लक्षित असते. त्या अनुषंगाने गाढवांच्या आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी धर्मा डाँकी सँक्च्युअरी संस्थेकडून मागील काही वर्षांपासून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सुंदर गाढव स्पर्धा

या वर्षाच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात घेण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात ‘देखणे व सुदृढ गाढव’ स्पर्धाही पार पडली. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सगरोळी, परळी परिसरात कार्यशाळा घेऊन त्यांना गाढवांचे व्यवस्थापन, प्रसूतिपूर्व व नंतरचे व्यवस्थापन याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. गर्दभ पालकांनाही आहाराची माहिती देण्यात आली. – अभिजित महाजन, विश्वस्त, धर्मा डाँकी सँक्च्युअरी