अलिबाग – माणगाव तालुक्‍यातील निजामपूर येथून किल्‍ले रायगडकडे जाणारा रस्‍ता दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होवून वाहतूकीसाठी खुला झाला. परंतु या रस्‍त्‍यासाठी आपली पिकती जमीन देणारे शेतकरी आता रस्‍त्‍यावर आले आहेत. यातील एकाही शेतकरयाला अद्याप या जागेचा मोबदला मिळालेला नाही. त्‍यामुळे निराश झालेल्‍या शेतकरयांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याची राजधानी किल्‍ले रायगड हे शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षी लाखो लोक रायगड किल्‍ल्‍याला भेट देत असतात. रायगडकडे जाण्‍यासाठी केवळ महाड येथून एकमेव मार्ग होता. परंतु राज्‍य सरकारने रायगडच्‍या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. अलीकडे रायगडावर येणारया शिवप्रेमींची संख्‍या वाढत चालली आहे. म्‍हणून रायगडकडे जाण्‍यासाठी पर्यायी मार्गाचा शोध सुरू होता. माणगाव तालुक्‍यातील निजामपूर येथून घरोशी मार्गे अत्‍यंत जवळचा मार्ग शोधून तो तयार करण्‍यात आला. यामुळे मुंबई पुण्‍याहून येणारया पर्यटकांना महाडला न जाता थेट रायगडावर पोहोचता येते.

या रस्‍त्‍यामुळे पर्यटकांचा मार्ग सुकर झाला असला तरी या रसत्‍यासाठी जमीन देणारया शेतकरयांची व्‍यथा वेगळीच आहे. निजामपूर , भाले, घरोशी, पळसगाव खुर्द, धामणी, वाढवण, शिरसाड, तळाशेत, कडापूर, करंबेळी, हरवंडी, खरबाची वाडी आदि १२ गावांतील २ हजार ७२३ खातेदार शेतकरयांच्‍या जमिनी या रस्‍त्‍यासाठी संपादीत करण्‍यात आल्‍या. खातेदार शेतकरी मोबदल्‍या पासून वंचित आहेत. या रस्‍त्‍याचे काम सुरू झाले तेव्‍हां कुठलेही सर्वेक्षण झाले नाही, शेतकरयांना विश्‍वासात घेतले नाही. तरीदेखील आपल्‍या भागाचा विकास होईल हे लक्षात घेवून इथल्‍या शेतकरयांनी आपल्‍या जमिनी देवू केल्‍या. यात अनेक शेतकरी भूमीहीन झाले. त्‍यावेळी जमिनीचा मोबदला देण्‍याची प्रक्रिया सुरू असल्‍याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्‍यात आले.

रस्‍त्‍याचे काम सुरू होवून ते पूर्णदेखील झाले. दोन वर्षांपूर्वीच या मार्गावरून नियमित वाहतूकदेखील सुरू झाली. बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारून थकलेल्‍या या शेतकरयांनी लोक प्रतिनिधींचेही उंबरठे झिजवले परंतु काहीच उपयोग झाला नाही. मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे यांनाही भेटून आमची व्‍यथा मांडली परंतु अद्यापपर्यंत एक छदामही मिळाला नसल्‍याचे शेतकरी सांगतात. आता आम्‍ही पहायचं तरी कुणाच्‍या तोंडाकडे असा सवाल या शेतकरयांनी उपस्थित केला आहे.

सरकारी दफ्तर दिरंगाईने हैराण झालेले शेतकरी आता एकवटले आहेत. त्‍यांनी निजामपूर पाचाड रस्‍ता शेतकरी संघर्ष समिती स्‍थापन केली आहे. या समितीच्‍या माध्‍यमातून रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन छेडण्‍याचा इशारा या शेतकरयांनी दिला आहे.

आम्‍ही विरोधाची भूमिका न घेता विकासाची भूमिका घेतली. रस्‍त्‍यासाठी जमिनी द्यायला कुठलाही विरोध केला नाही उलट सहकार्य केले. वारंवार प्रांताधिकारी, तहसीलदार, पुढारी यांचयाकडे खेटे मारले परंतु आम्‍हाला अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आता रस्‍त्‍यावर उतरल्‍याशिवाय पर्याय उरलेला नाही. – तुकाराम पवार, शेतकरी

रस्‍त्‍यासाठी संपादीत जागेच्‍या मोबदल्‍याची मागणी आम्‍ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. ही रक्‍कम अद्याप आमच्‍या कार्यालयाला प्राप्‍त झाली नाही. त्‍यासाठी आमच्‍या कार्यालयाचा पाठपुरावा सुरू आहे. – संदीपान सानप, प्रांताधिकारी माणगाव