अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १ हजार ६०२ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सरपंचपदासाठी ४८५ तर सदस्यपदासाठी ३ हजार ३९५ जण निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहेत.

जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना लागलीच चिन्ह वाटपही करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ८२५ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ११ जणांचे अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले. त्यामुळे ८१४ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदाच्या ३२९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ४८५ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीत शिल्लक राहीले आहेत. तर २१० ग्रामपंचायतीच्या १ हजार ८५४ जागांसाठी ४ हजार ७१६ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ४८ अर्ज छाननीत अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या १ हजार २७३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूकीत ३ हजार ३९५ उमेदवार शिल्लक राहीले आहेत.

हेही वाचा : सुनील तटकरेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यात आज इंडीया आघाडीचे शक्तीप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर

निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे प्रचाराला वेग येणार आहे. युत्या आघाड्यांचे चित्रही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. सर्व ग्रामपंचायतीसाठी दिवाळी पूर्वी ५ नोव्हेंबर ला मतदान होणार असून, मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे दिवाळी फटाके कुठे फुटणार आणि मतांचा फराळ कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूकीत राजकीय पक्षांचाही कस लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

हेही वाचा : Maharashtra News Live : “जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती, पण…”, अजित पवार गटातील मंत्र्यांचं विधान

सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या

अलिबाग ४३, मुरुड ३८, पेण २५, पनवेल ४७, उरण ९, कर्जत २१, खालापूर ६१, रोहा ३५, सुधागड २९, माणगाव ५८, तळा १५, महाड ३६, पोलादपूर ३९, म्हसळा १३ आणि श्रीवर्धन १६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदस्य पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या

अलिबाग ३९९, मुरुड २८०, पेण २०८, पनवेल ३६०, उरण ८१, कर्जत १६०, खालापूर ४०४, रोहा २४२, सुधागड २१२, माणगाव ३३५, तळा ५७, महाड २१४, पोलादपूर २५७, म्हसळा ८४, आणि श्रीवर्धन १०२.