अलिबाग– रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिका क्षेत्रात ४ हजार १५६ दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. खोपोली येथे सर्वाधिक तर माथेरान येथे सर्वात कमी दुबार मतदार असल्याचे पडताळणीत समोर आले आहे. दुबार मतदान रोखण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी नगरपरिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, नगर पालिका प्रशासन विभागाचे प्रमुख विराज लबडे उपस्थित होते. मतदार यादीत आढळलेल्या दुबार आणि तिबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केला.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड-जंजीरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान या १० नगरपरिषदांनी आपले अहवाल सादर केले आहेत. या अहवालानुसार, एकूण ४ हजार १५६ दुबार किंवा तिबार नावे मतदार यादीत आढळली आहेत. या सर्व नावांपूढे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार डबर स्टार देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर या सर्व मतदारांकडून कुठल्या मतदान केंद्रांवर मतदान करणार याबाबतचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. एकही मतदार दोन ठिकाणी मतदान करू शकणार नाही याची दक्षता घेतली जणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सर्वाधिक दुबार मतदार हे खोपोलीत आढळले आहेत. खोपोलीत ८९१, अलिबागमध्ये २४४, श्रीवर्धनमध्ये १३१, मुरुड-जंजीरामध्ये ६९, रोह्यात ६२, महाडमध्ये ३५९, पेणमध्ये ७८४, उरणमध्ये ७८१, कर्जतमध्ये ८१७ आणि माथेरानमध्ये १८ दुबार मतदार आढळले आहेत अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांनुसार नगरपरिषदांच्या मतदार याद्या आगामी निवडणुकीसाठी अद्ययावत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
