अलिबाग – शेती पिकांची अद्ययावत परिस्थिती कळावी यासाठी राज्यात ई पीक पाहणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महसूल विभागाकाडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला शेतकऱ्याकंडून मात्र फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यात जेमतेम २६ टक्के शेतकऱ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामागचा मूळ उद्देशच साध्य होऊ शकलेला नाही.
हवामानातील बदल, अतिवृष्टी, वादळे, महापूर, आवर्षण, दुष्काळ यासारख्या कारणांनी शेतीवर विपरीत परिणाम होत असतो. ज्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होते. अशा वेळी नुकसान भरपाई देण्यासाठी त्या क्षणीचा वस्तुस्थिती दर्शक आणि वस्तुनिष्ट अहवाल अपेक्षित असतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या महसूल विभागाने पीक परिस्थितीची वस्तुनिष्ठ महिती मिळावी यासाठी एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. ज्यातून पिकांच्या वेळोवेळी असलेल्या परिस्थितीची वस्तुनिष्ट माहिती संकलित केली जाते आहे.
हेही वाचा – कराडच्या वसंतगडचे सुपुत्र नायब सुभेदार शंकर उकलीकर लेहच्या बर्फाळ प्रदेशात हुतात्मा
पीक पेरणीचा रियल टाईम डेटा संकलित करणे पीक पेरणीच्या माहिती संकलनात पारदर्शकता आणणे, पीक पेरणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा प्रक्रिया सहकार्य करणे, पीक पाहणी प्रक्रिया निकाली काढण्यासाठी सहकार्य करणे, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्देश असून, १५ ऑगस्ट २०२१ पासून हा ई पीक पाहणी कार्यक्रम राज्यात सुरू करणात आला आहे.
एरवी कृषी आणि महसूल विभागामार्फत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. ज्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी होत असतात. ज्यांचे नुकसान होते ते शेतकरी वंचित राहतात तर इतरांना मदत दिली जाते, अशी ओरडही होत असते. अशा वेळी ई पीक पहाणी अॅप विश्वासार्ह आणि उपयुक्त ठरू शकते. मात्र रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून या ई पीक पहाणी अॅपला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ५ लाख १७ हजार १९५ शेती खातेदार आहेत. यापैकी ८८ हजार १२८ शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपसाठी नोंदणी केली आहे. हे प्रमाण २६ टक्के येवढेच आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांकडून या ई पीक पाहणीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ई पीक पहाणी मागचा हेतूच साध्य होताना दिसत नाही.
१५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी नोंदणी करता येणार आहे. हवामानातील बदलामुळे पिकाचे नुकसान झाल्यास, या ई पीक पाहणीची मोठी मदत शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी उपक्रमासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. – सचिन शेजाळ, तहसीलदार महसूल