सांगली : विसापूर-पुणदी योजनेच्या पाण्यासाठी सावळज परिसरातील शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन रविवारी केले. जलसंपदा अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे म्हणत आंदोलकांनी ठिय्या मारला. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेत असताना झटापटही झाली.

विसापूर – पुणदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे रविवारी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

हेही वाचा : “अमरावतीमधून निवडणूक लढवू नका, अमित शांहाचा फोन आणि…”, आनंदराव अडसूळांना बदल्यात काय मिळालं?

पुणदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते. मात्र एका नेत्याच्या सांगण्यावरून अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत. पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळज शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासाभरापासून रास्ता रोको सुरू केला आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा : “शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांना पोलीसांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलक यांच्यात किरकोळ झटापटही झाली. आंदोलकांना तासगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कारवाईची सुरु करण्यात आल्याचे समजताच रोहित पाटील यांनीही पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या मारला आहे.