सांंगली : गेल्या दहा वर्षात केवळ दुसर्‍याने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचे काम खासदार संजयकाका पाटील यांनी केले असल्याची टीका निवडणूक प्रचाराच्या शुभारंभालाच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यानंतर पाटील यांनी औदुंबर येथे मंगळवारी प्रचार शुभारंभ केला.

यावेळी ते म्हणाले, प्रचारासाठी केवळ दहा ते बारा दिवसांचा कालावधी मिळाला असला तरी माझी उमेदवारी जनतेची आहे. हा लढा सांगलीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा आहे. गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक संपर्कात आहे. जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली असल्याने मला फारशी चिंता उरलेली नाही. मला मिळालेले लिफाफा हे चिन्ह मतदारापर्यंत पोहचविण्यात कोणतीच अडचण वाटत नसून आहेराच्या स्वरूपात मला जनता मतदान करेल असा विश्‍वास वाटतो.

हेही वाचा : “जावयाचं सासुरवाडीवर जास्त प्रेम असतं”, संभाव्य उमेदवारीला विरोध झाल्याने संजय निरुपमांची खोचक पोस्ट; म्हणाले…

प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जत तालुक्यात त्यांनी प्रचार दौरा केला. जत तालुका सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये मोठा आहे. विद्यमान खासदारांनी या तालुक्याकडे लक्षच दिलेले नाही. मंजूर कामाचे नारळ फोडण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप जत तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी प्रसंगी त्यांनी केला. जत तालुक्यात मुचंडी जिल्हा परिषद गटाअंतर्गत रावळगुंडवाडी येथे, दरीबडची पंचायत समिती गणांअंतर्गत दरीबडची, उमदी, जाडर बोबलाद, माडग्याळ आदी ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. कोत्याव बोंबलाद व जल्याळ बुद्रुक येथील यात्रांनाही त्यांनी भेटी दिल्या.

हेही वाचा : अमरावतीमधील अमित शाहांच्या सभेवरून राडा; रवी राणा म्हणाले, “बच्चू कडू स्वस्तातली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरजेत जयश्री पाटील प्रचारात

मिरज शहरात स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी प्रचार दौरा केला. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, निंरजन आवटी, संदीप आवटी आदी सहभागी झाले होते.