सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या सहा नगरपालिका व दोन नगरपंचायतीसाठी तब्बल १ हजार ६७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मंडळींची कसोटी लागली आहे. सर्वाधिक उमेदवारी अर्ज ईश्‍वरपूर नगरपालिकेसाठी दाखल झाले असून या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी १४ तर ३० सदस्यांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासाठी ईश्‍वरपूर आणि आष्टा नगरपालिका प्रतिष्ठेच्या आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडी व महायुती आमनेसामने असून ईश्‍वरपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे व विश्‍वनाथ डांगे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. याशिवाय अन्य १२ उमेदवार मैदानात आहेत. तर आष्ट्यामध्ये आमदार पाटील व शिंदे गट यांची शहर विकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत असून विशाल शिंदे विरूध्द प्रवीण माने असा सामना या ठिकाणी रंगत आहे.

विटा नगरपालिका व आटपाडी नगरपंचायत या खानापूर विधानसभा मतदार संघात महायुतीतील भाजप विरूध्द शिवसेना शिंदे गट यांच्यातच खरी चुरस पाहण्यास मिळत आहे. विटा नगरपालिकेवर आतापर्यंत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी कोणत्याही स्थितीत नगरपालिकेची सत्ता ताब्यात घ्यायचीच या जिद्दीने शिवसेनेचे आमदार सुहास बाबर मैदानात उतरले असून जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आटपाडी नगरपंचायतीसाठी शिवसेनेचे तानाजी पाटील विरूध्द भाजपचे अमरसिंहबापू देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर असा सामना होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही या ठिकाणी आपले उमेदवार मैदानात उतरविल्याने तिरंगी लढत होत आहे.

जतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेे. डॉ. रविंद्र आरळी यांना नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मैदानात उतरवले असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सुजयनाना शिंदे हे मैदानात आहेत. अखेरपर्यंत चर्चेच्या फेर्‍या करूनही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नगराध्यक्ष पदावर काँग्रेसशी आघाडी होउ शकली नाही. यामुळे सुरेश शिंदे हे नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पाठिंब्यावरच नव्हे तर घड्याळ चिन्हावर मैदानात उतरले आहेत. यामुळे जतमध्ये तिरंगी लढत होत आहे.

पलूसमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसने संजीवनी पुदाले यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. तर महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकमत न झाल्याने भाजपने सोनाली नलवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने ज्योत्स्ना येसुगडे यांची उमेदवारी दाखल झाली आहे. या ठिकाणी आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी, महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असा तिरंगी सामना होत आहे. शिराळा नगरपंचायतीसाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे गट एकत्र आले असून या गटाच्या माध्यमातून महायुतीला आव्हान देण्यात आले आहे.