सातारा : सातारा शहरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीने गोंदवले येथे युवकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर रविवारी माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर नातेवाईक व हिंदुत्ववादी संघटनांनी मुलीला न्याय मिळावा म्हणून आक्रमक भूमिका घेत पोवईनाका येथे रास्ता रोको केला. यावेळी वाहतूक कोंडी होऊन काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोवईनाका येथे धाव घेत नातेवाइकांची भेट घेत कडक कारवाईचे आश्वासन दिले. दहिवडी पोलिसांनी तस्लीम मोहम्मद खान (रा. रविवार पेठ सातारा) याला सांगलीहून अटक केली. गोंदवले येथे एका अल्पवयीन मुलीने दूरध्वनीवरून येणाऱ्या सततच्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी राहत्या घरी गळफास लावून

आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी तस्लिम मोहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या आईने दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीनुसार, तस्लीम खान हा दूरध्वनीवरून आईला व घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत असल्याने मुलीने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वीही तो दूरध्वनीवरून वारंवार त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तस्लीम हा याअगोदर संबंधित मुलीला त्रास देत होता. तस्लीम जामिनावर सुटल्यावर तो दूरध्वनी करून त्रास देत होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोटे करत आहेत. दहिवडी घटनेतील पीडितेचे नाव आणि छायाचित्र कोणीही समाज माध्यमावर दिल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

हेही वाचा : कोयना धरणक्षेत्रातील पावसाने वार्षिक सरासरीही टाकली मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज या मुलीवर माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहिवडी येथील घटनेमुळे साताऱ्यात नातेवाईक आक्रमक झाले होते. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, राखीव पोलीस दल यांनी तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोवई नाका येथे धाव घेत नातेवाइकांना समजावून कारवाईचे आश्वासन दिले. संतप्त नातेवाईक व हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस मुख्यालय येथे धाव घेतली. यावेळी पीडित मुलीचे नातेवाईक व शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सुमारे दोन तास पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी चर्चा केली. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, राखीव पोलीस दल यांनी तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.