सातारा: माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवर वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे. माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारकऱ्यांनी रथापुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषात व टाळ वाजवत हे वारकरी अर्धा तास बसून होते. यामुळे गोंधळ उडाला. सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत कडक भूमिका घेत वारकऱ्यांसोबत समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याला वारकऱ्यांकडून प्रखर विरोध होत आहे.

हेही वाचा : सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद

आषाढी एकादशीच्या दर्शनानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाकडे निघाला आहे. परतीच्या प्रवासात रथा पुढे २७ तर रथामागे ३५० दिंड्या आहेत. गुरुवारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील मुक्काम आटपून आज सकाळी पावणे नऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थ माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मालकांकडून पादुका रथाकडे येत असताना प्रथे प्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारकऱ्यांनी तयार केल्या होत्या. सोहळा मालकांनी पादुकांचे वारकऱ्यांना दर्शन देणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले. मात्र परत जाताना रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन दिले नाही. सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने रथामागील वारकरीं नाराज झाले व त्यांनी लागलीच रथा पुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. माऊली माऊलीचा जयघोष करत टाळ वाजवत सुमारे एक तास माऊलींचा रथ अडवून धरला. यानंतर सोहळा प्रमुख व सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. माऊलींचा रथ तासाभरानंतर मागील वारकऱ्यांना तसेच ठेवून नीरेकडे निघून गेला आहे. रथामागील वारकरी भजन म्हणत ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.

हेही वाचा : Nashik Crime: नाशिकमध्ये गुंडाची ‘बॉस इज बॅक’ म्हणत मिरवणूक, ‘गोली मार भेजे में’ गाण्यावर नाच; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तासाभरानंतर रथाच्या मागील वारकरी निषेध नोंदवत नीरा येथील दुपारच्या विसाव्याकडे निघाले. आजचा मुक्काम वाल्हे येथे असणार आहे. याठिकाणी रात्री समाज आरती वेळी रथा मागील वारकरी आपले म्हणणे मांडणार असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.