सातारा : वडूज – दहिवडी रस्त्यावर तीन मोटारींच्या भीषण अपघातात औंध येथील दोघे जागीच ठार झाले. शिवम शिंदे व प्रसाद सुतार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून ते दोघेही मित्र आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी- वडूज रस्त्यावर प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने भरधाव मोटार चालवून त्याच्या समोर जाणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या मालवाहू मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात प्रसाद राजेंद्र सुतार शिवम, शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौरमोडे (रा. औंध), मालवाहू गाडीतील लालासाहेब परशुराम पाटोळे, ज्योती लालासाहेब पाटोळे ( रा. दरुज) व पाठीमागून ठोकरलेल्या गाडीतील रोहन आप्पासाहेब भिसे व आकाश सोनबा बर्गे (रा. वडूज) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराला जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. धनाजी आबाजी सुळे (रा. पिंपळवाडी, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातातील मृत शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे. दोघेही मित्र होते. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला.