सावंतवाडी :​अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हे जिल्हे आपदग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये भातशेतीसह झालेल्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी पंचनाम्यांच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

​शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, नारायण राणे, दिनेश गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​यावेळी प्रेमानंद देसाई यांनी ‘ओंकार हत्ती’ आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानभरपाईच्या प्रश्न उपस्थित केला होता. यावर आमदार केसरकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त जाहीर झाला आहे.आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

​अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार केसरकर यांनी केले.या पंचनाम्यांनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

​ओंकार हत्ती होणार जेरबंद: ‘ओंकार’ हत्तीला येत्या आठवडाभरात जेरबंद करण्याची तयारी पूर्ण झाली असून लवकरच त्याला पकडले जाईल, अशी माहितीही आमदार केसरकर यांनी दिली.