सावंतवाडी : गणेश चतुर्थीचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी केले आहे. शहरातील पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत लेझर लाईटवर बंदी घालण्यात आल्याचे आणि डीजे नियमानुसार वाजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खदंकर उपस्थित होते. बैठकीत विविध प्रशासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, एसटी महामंडळ, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेवर चर्चा झाली.
एसटी आणि रेल्वे प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने ६० ते ७० जादा बसेस उपलब्ध करून दिल्याचे आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी सांगितले. रेल्वे स्थानकावरून बांदा व इतर भागांसाठी एसटीच्या जादा फेऱ्या सुरू करण्याची मागणीही सदस्यांनी केली. रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर यांनी रेल्वे गाड्यांची माहिती दिली. रेल्वे आणि एसटी महामंडळाने समन्वय साधून प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
बैठकीत रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर यांनी रिक्षा भाड्याच्या दराबाबत माहिती दिली. रिक्षा चालकांनी प्रवाशांना भाडे नाकारल्यास त्यांच्यावर कारवाईला हरकत नाही, असे ते म्हणाले. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून योग्य पार्किंग व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.
खराब रस्ते आणि होर्डिंग्ज
शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडीमुळे होणाऱ्या समस्यांवर सदस्यांनी लक्ष वेधले. अपघात टाळण्यासाठी विनापरवाना लावलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आणि शांतता समितीतील सूचनांची दखल घेतली न गेल्याबद्दल असमाधान व्यक्त केले.
अमली पदार्थ आणि अवैध दारू
शहरात अंमली पदार्थ आणि गोव्याहून येणाऱ्या बनावट दारूच्या विक्रीवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर, नकुल पार्सेकर,पत्रकार सिताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, जगदीश मांजरेकर, बाळ बोर्डेकर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळ सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. शांततेत सण साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.